बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले
आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती
पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले
पालखी उतरुन त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,"बाजी,आम्हाला असं पोरकं करून कुठे चाललात?" राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा
मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणाऱ्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्हाईलं
पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातु सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग
म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....." राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली.....