!! श्री अंबिका माता प्रसन्न !!
तोंडोली गावचे आराध्य दैवत
श्री अंबिका मातेचा महिमा
!! श्री अंबिका माते तुझा वास आहे, तोंडोली या क्षेत्री.
!! श्री अंबिका माते तुझा वास आहे, तोंडोली या क्षेत्री.
जी आदिमाया प्राणवरूपीणी, जी अनंत शक्तीची स्वामिनि !
जी अनंत अवतार घेऊनी भक्तांसी रक्षणारी,
असंख्य भक्तगण येती तुझ्या दर्शनासी. !!
सर्व देवांच्या तेजा पासुन उत्पन्न झालेली , पृथ्वी तलावरिल दुष्टप्रवृतिचा वध करणारी अशी ही आदिमाया जगदंभा म्हणजेच तोंडोली गावची श्री अंबिका माता !
तोंडोली क्षेत्री अतिरम्य अशा ठिकाणी त्रिवेणी ओढयाच्या संगमावरती हिरव्यागार गर्द झाड़ीमध्ये श्री अंबिका मातेचे सुंदर असे पुरातन मंदिर आहे। सूर्य रोज सकाळी या दाट झाड़ामधून मंदिर तेजोमय करतो। या समयी कोकिळा साद घालून जणू देवीला आळवीत असल्याचा भास होतो।
श्री अंबिका मातेचे स्थान हे स्वयंभू कोकणस्थ जागृत देवस्थान आहे। देवीची मूर्ति पाषणमूर्ति असून तिची उंची साडे तिन फुट आहे। दगडी सिंहासनावरती विराजमान आहे। देवीचा गाभारा हा हेमांडपंथी असून कोरीव पाषाणी शिळेपासून तयार केलेला आहे। गाभा-याला छोटेसे प्रवेश द्वार असून समोर कसाव मूर्ति आहे। हळदी-कुंकवाचा मान घेउन समस्त भक्तगणांवर कृपा करणा-या श्री अंबिका देवीस प्रेमाने, साजाबाई, आई जगदंभा, आई भवानी अशा विविध नामांनी भक्त गण साद घालतात।
श्री अंबिका देवीच्या स्थाना बद्दल थोडक्यात माहिती अशी की, पूर्वी ग्रामस्थ बैलगाडयांमधून उदरनिर्वाहासाठी गुळ, मिरची व धान्य इत्यादींचा व्यापार करण्या साठी महाड, चिपळूण, रत्नागिरी इत्यादि भागात जात असत व त्या ठिकाणचे आवश्यक ते उत्पादन त्या मोबदल्यात घेउन तोंडोली मुक्कामी येत असत। अशाच एका ग्रामस्थाच्या बैलगाडीच्या बैलाच्या उजव्या पायातून देवीने पाषाण रुपात तोंडोली क्षेत्री प्रवेश केला।
देवालय कमिटीने भक्त गणांकडून येणा-या देणगीतून प्रशस्त असे पत्र्याचे शेड उभारले होते सध्या तीन मजली सभामंडपाचे बांधकाम सुरू आहे लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे.
तोंडोली क्षेत्री श्री अंबिका मातेच्या मंदिराच्या उजव्या बाजूला श्री रामेश्वराचे मंदिर व समोरच काही अंतरावर श्री शंभो महादेव व मारुती मंदिर आहे. त्याचबरोबर श्री विठोबा-रूक्मिणी, श्री राम, श्री साईबाबा, श्री दत्त दिगंबर, श्री नगोबा, श्री मायाक्का, पिर व भैरवनाथ मंदिर इत्यादी मंदिरे आहेत. ह्या सर्व देवदेवतांची भक्तगण मनोभावे पूजा करतात.
श्री अंबिका मातेच्या मंदिरात वर्ष भर अनेक उत्सव पार पडतात. वैशाख पौर्णिमेस देवीची वार्षिक यात्रा मोठया थाटात साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिरात विद्दुत रोषणाई केली जाते. हाती बनविलेल्या शोभेच्या कमानी प्रवेशद्वारावर लावतात. मंदिरास रंगरंगोटी करून मंदिरासमोरील पटांगणात भव्य-दिव्य अशा रांगोळ्या काढून मंदिर अगदी आकाशातील तारकांप्रमाणे सजविले जाते. त्यादिवशी तोंडोली गावातील प्रत्येक घरातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक भक्तगण पहाटे ४.०० वाजल्यापासुन दंडस्थान घालतात.
ह्या दिवशी पहाटे ५.०० वाजता देवीच्या स्वयंभू मुर्तीस अभिषेक स्नान घातले जाते. ह्या वेळी पुजारी मंत्रपठण करीत अभिषेक स्नान घालतात. अभिषेक स्नान घालण्यास दही, साखर, केळी, चंदन, तेल, गरम पाणी, सुवासिक तेल, इत्यादींचा वापर केला जातो. नंतर हळदी-कुंकवाचा मळवट भरून हार फुलांनी मूर्ती सजविली जाते व महानैवेद्य दाखवून सुस्वर अशी आरती झाल्यानंतर देवीच्या दर्शनास मंदिरात रांगेने भक्तगण जातात.
उत्सवाच्या दिवशी देवीच्या उत्सवमुर्तीस साज शृंगार करून नाना
अलंकार घालून हत्ती, घोडा, मोर, वाघ, इत्यादी पैकी एका सिंहासनावर आरूढ केले जाते. वैशाख पौर्णिमेस देवीच्या दर्शनास पंचक्रोशीतील लाखो भक्त दर्शन घेतात. अनेक जण देवीच्या कृपशिर्वादाने इच्छा पुर्ति झाल्याबद्दल वाजत गाजत नवस फेडण्यास येतात व पुढील आयुष्यात सुखशांती लाभो अशी देवी चरणी प्रार्थना करतात.
रात्री ९.०० च्या नंतर कुंभार समाजाचे मानाचे गोंधळी मनोभावे देवीचा गोंधळ घालतात व उत्कृष्ट कलाविष्कार भक्तांच्या समोर सादर करतात मानाच्या गोंधळयांनी मंदिरात गोंधळ घातल्याशिवाय देवीची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघत नाही. देवीच्या गोंधळानंतर आरती केली जाते. व श्री अंबीकामातेची सजवलेली पालखि '' अंबाबाईच्या नावाने चांगभल '' च्या गजरात उचलली जाते. पालखिला खांदा देऊन पाच पाउले सेवा करण्यासाठी असंख्य भक्त गणांची झुंबड उदते. मंदिरातून पालखि निघताना मंदिरासमोरील दगडी दीपमाळ प्रज्वलित केली जाते.
प्रदक्षिणेच्या वेळी गावातील सुवासिनी पालखीला ओवाळण्यासाठी ठिकठिकाणी पंचारती घेऊन उभ्या असतात. हे दृश्य अगदी नयन रम्य असते. हजारोंच्या संख्येने जमलेले भक्तगण हा ऐतिहासिक सोहळा पाहून क्रतार्थ होतात. नगर प्रदक्षिणेला सर्वसाधारण दोन ते तीन तास लागतात. त्यानंतर यात्रेकरूंसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर होतात. दुस-या दिवशी कुस्त्यांचे जंगी सामने, बैलगाड्यांच्या शर्यती, क्रिकेटचे सामने इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थ, यात्रा कमिटी व देवालय कमिटीतर्फे केले जाते.
श्री अंबिका देवीच्या मंदिरात अश्विन शुध्द प्रतिपदे पासुन शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. ह्या उत्सवातही दंडस्थान घेतले जाते. नऊ दिवस देवीची उत्सवमूर्ती वेगवेगळ्या रत्नजडीत सुवर्णालंकाराने सजविली जाते. पाचव्या दिवशी हत्ती या वाहनावर विशेष पूजा बांधली जाते, अष्टमीच्या दिवशी होमहवनाचे आयोजन केले जाते. नऊ दिवस देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा काढली जाते. यावेळी गावातून सकाळी व संध्याकाळी धुपारती फिरते. गावातील सर्व दैवतांचे दर्शन घेतले जाते.
हरिजागरच्या दिवशी श्री अंबिका देवीची पालखी धाकटा भाऊ श्री भैरवनाथाच्या भेटीस सकाळी अकराच्या सुमारास निघते. दहाव्या दिवशी पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर भक्तगण आपटयांची पाने (सोने) एकमेकांस वाटून भेटी घेतात. हयातुन एकता व बंधूत्वाचे दर्शन होते.
मिती अश्विन वद्य द्वितीयासह् मंदिरामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केले जात होते. २०११ पासून वैशाख शुध्द पंचमी पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात येत आहे। हे पारायण सात दिवसाचे असून पंचक्रोशितील असंख्य भक्त, हरिभक्त पारायण मंडळी व नामवंत कीर्तनकार कीर्तन प्रवचने देऊन रात्रभर जागरण करतात.
पारायणाच्या वेळी सतत सात दिवस पहाटे ४.०० ते ६.०० वाजेपर्यंत काकड आरती केली जाते. या समयी गावातील असंख्य सुवासिनी पंचारती घेऊन देवीस ओवाळण्यास येतात. टाळ-मृदंग-वीणा यांच्या सुरात सुस्वर आरती केली जाते. सर्वांना ह्या वेळी अगदी निराळ्या विश्वात प्रवेश केल्याचा भास होतो.
काकड आरतीच्या अगोदर देवीच्या पाषाण मुर्तीस पहाटे ५.०० वाजता दुग्धशर्करा स्नान घातले जाते. त्यावेळी देवीची मूर्ती अतिशय सुंदर धवलशुभ्र दिसते. हा अभिषेक सोहळा पाहण्यास हजारो भक्तांची गर्दी जमते. अनेक भक्तांचे असे मत आहे की काकड आरतीचे दर्शन घेणे हे एक पुण्यकर्म आहे. काकड आरती चालू असताना देवीची निरनिराळी रूपे पाहावयास मिळतात.
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे संबोधतात. तुळशी विवाहानंतर ही पौर्णिमा येते. या दिवशी हजारो पणत्या प्रज्वलित केल्या जातात व देवळासमोरील दगडी दीपमाळ ही प्रज्वलित करतात हे नयन रम्य दृष्य पाहण्यास भक्तगण बहुसंख्येने उपस्थित रहातात.
पौष महिन्यात मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात सुहासिनी हळदी-कुंकू समारंभ साजरा करतात. मंदिराच्या आवारात महिला तर्फे विविध खेळ खेळून आनंदोत्सव साजरा केला जातो.
अशा प्रकारे अनेक छोटे-मोठे उत्सव मंदिरात नित्यनियमाने पार पडतात. त्याचबरोबर दर मंगळवार व शुक्रवार या दिवशी देवीचे मंदिर भक्तगणांनी तुडूंब भरून जाते. या दिवशी भक्तगण नवसाच्या वा-या पूर्ण करण्यासाठी पहाटे लवकर देवीला दही-दुधाची आंघोळ घालण्यास येतात. तर काही नवसाच्या जत्रा करण्यास परगावातून खाजगी वाहने करून येतात. तर काही जण आपल्या समस्या सांगण्यास व नवस बोलण्यास येतात.
दैविक आरत झाल्यानंतर पुजारी भक्तगणांच्या समस्या ऐकुन देवीस कौल लावुन त्या सोडविण्याचा मार्ग समजावून सांगतात. देवीच्या मंदिरात दर अमावस्येला व पौर्णिमेलाही भक्तगणांची गर्दी असते. या दिवशी सायंकाळी ७.०० वाजता दगडी दीपमाळ तेल-तूपाचा वापर करून प्रज्वलित करण्याची प्रथा आहे.
अशी ही तोंडोली क्षेत्री वास करून असलेली स्वयंभू जागृत आई जगदंभा, आई साजाबाई, श्री अंबिका माता भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तयार असते. तिच्या नामोच्चारणेही भक्तांची बरीच संकटे संपुष्टात येतात असा हा श्री अंबिका मातेचा महिमा थोडक्यात लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आई अंबिका आम्हा सर्वांना सदबुध्दि देवो व भक्तांस उदंड आयुष्य देवो.
ही तिच्या चरणी मनोभावे प्रार्थना.