Social Icons

Image and video hosting by yuvrajmohite.com

“त्रिपुरारी पौर्णिमा २०१७”-tripurari purnima 2017

“सस्नेह   निमंत्रण”

“त्रिपुरारी पौर्णिमा २०१७”   

"तीर्थक्षेत्र श्री अंबिका मंदिर तोंडोली"

आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री अंबिका मंदिर तोंडोली, ता: कडेगाव, जि: सांगली येथे "त्रिपुरारी पौर्णिमा" आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे शुक्रवार दि:०३/११/२०१७ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संपन्न होत आहे. या दिवशी संपूर्ण मंदिरात ११,१११ दीप (पणत्या) प्रज्वलित करण्यात येणार आहेत, मंदिरात दीप प्रज्वलन केल्यामुळे संकटे नाश पावतात. त्यामुळे असंख्य भक्तगण नवसा प्रमाणे मातीच्या पणत्या तेल व तूप घालून दीप प्रज्वलित करतात. मंदिर सभामंडपात रांगोळ्या काढल्या जातात. संपूर्ण मंदिराला भव्य विदयुत रोषणाई केली जाते. या दिवशी मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते.

सर्व देवांच्या तेजा पासुन उत्पन्न झालेली, पृथ्वी तलावरिल दुष्ट प्रवृतिचा वध करणारी अशी ही आदिमाया जगदंभा म्हणजेच तोंडोली गावची श्री अंबिका माता!श्री अंबिका मातेचे स्थान हे जागृत देवस्थान आहे।  श्री अंबिका मातेचे भव्यदिव्य मंदिर सर्व देणगीदार, हितचिंतक व अंबिका भक्त्यांच्या सहकार्यामुळे पूर्णत्वास येत आहे, मंदिराचे प्लास्टर व कलर काम पूर्ण झालेले आहे, वायरिंग व कळस इत्यादी शेवटच्या टप्प्यातील कामे राहिलेली आहेत, तरी या कार्यासाठी कुणाला देणगीरूपी मदत करायची असल्यास आपण  आवश्य देणगीरूपी मदत करू शकता. भविष्यात विविध समाजउपयोगी कामे करावयाची आहेत. श्री अंबिका मातेच्या मंदिरात वर्षभर अनेक उत्सव पार पडतात. वैशाख पौर्णिमेस देवीची वार्षिक यात्रा मोठया थाटात साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिरात विद्दुत रोषणाई केली जाते. हाती बनविलेल्या शोभेच्या कमानी  प्रवेशद्वारावर लावतात. अनेक जण देवीच्या कृपशिर्वादाने इच्छापुर्ति झाल्याबद्दल वाजत गाजत नवस फेडण्यास येतात व पुढील आयुष्यात सुखशांती लाभो अशी देवी चरणी प्रार्थना करतात. हजारोंच्या संख्येने जमलेले भक्तगण हा ऐतिहासिक सोहळा पाहून क्रतार्थ होतात.  श्री अंबिका देवीच्या मंदिरात अश्विन शुध्द प्रतिपदे पासुन शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. ह्या उत्सवातही दंडस्थान घेतले जाते. नऊ दिवस देवीची उत्सवमूर्ती वेगवेगळ्या रत्नजडीत सुवर्णालंकाराने सजविली जाते. मिती अश्विन वद्य द्वितीयासह् मंदिरामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केले जात होते. पारायण सात दिवसाचे असून पंचक्रोशितील असंख्य भक्त, हरिभक्त पारायण मंडळी व नामवंत कीर्तनकार कीर्तन प्रवचने देऊन रात्रभर जागरण करतात. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे संबोधतात. तुळशी विवाहानंतर ही पौर्णिमा येते. या दिवशी हजारो पणत्या प्रज्वलित केल्या जातात व देवळासमोरील दगडी दीपमाळ ही प्रज्वलित करतात हे नयन रम्य दृष्य पाहण्यास भक्तगण बहुसंख्येने उपस्थित रहातात.

पौष महिन्यात मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात सुहासिनी हळदी-कुंकू समारंभ साजरा करतात. मंदिराच्या आवारात महिला तर्फे विविध खेळ खेळून आनंदोत्सव साजरा केला जातो. अशा प्रकारे अनेक छोटे-मोठे उत्सव मंदिरात नित्यनियमाने पार पडतात. अशी ही तोंडोली क्षेत्री वास करून असलेली स्वयंभू जागृत आई जगदंभा, आई साजाबाई, श्री अंबिका माता भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तयार असते. तिच्या नामोच्चारणेही भक्तांची बरीच संकटे संपुष्टात येतात असा हा श्री अंबिका मातेचा महिमा आहे. तरी आई अंबिका आम्हा सर्वांना सदबुध्दि देवो व भक्तांस उदंड आयुष्य देवो.ही तिच्या चरणी मनोभावे प्रार्थना.

दीपावली असो वा त्रिपुरारी पौर्णिमा असो दीप उजळवून अंधकाराचा नाश करण्याची शिकवण देणारे हे भारतवर्षातले सण वा उत्सव आपल्याला आपल्या आदर्श, महान भारतीय परंपरेची ओळखच करून देतात. दिवे लावून परमेश्वरी कृपेच्या सत्याचा उजेड आपल्या मनात पडावा यासाठी असे दीपोत्सव आवश्‍यक असतात आणि त्यांपासून प्रेरणा घ्यायची असते ती निराशाजनक वातावरणातही न डगमगता खंबीरपणे, मनोधैर्य उंचावून, "त्या" एकावर, "त्या" च्या अगाध सामर्थ्यावर अढळ, अविचल श्रध्दा ठेवून जीवनात, "त्या" भगवंताच्या तेजाचा वारसा जागवायचा. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश, उजेड, आनंद देणारा उत्सव. आपल्या मनातील क्रोध, द्वेष, मत्सर नाहीसा करून भगवान शिव-शंकराची पूजा करावी, आराधना करावी व सुख-शांती याची मागणी करावी. असा संदेश या उत्सवातून मिळतो.

      कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रुंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला, या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुध्दा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासूराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटली जाऊ लागली. या दिवशी घरात, घराबाहेर व मंदिरातही  दिव्याची आरास करून व नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. धर्म ग्रंथानुसार याच दिवशी महादेवाने तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांच्या त्रिपुरा (नगर) चा नाश केला. त्रीपुरांचा नाश केल्यामुळेच महादेवाचे एक नाव त्रिपुरारी असे पडले. अशी या उत्सवाची महती आहे. 

या उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं नियोजनही श्री अंबिका मंदिरात करण्यात आलेले आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात, श्री अंबिका मंदिर भक्तांच्या गर्दीमुळे तुडुंब भरलेले असते. संपूर्ण मंदिराला भव्य विदयुत रोषणाई केली जाते, त्यामुळे मंदिर परिसरात अतिशय सुंदर असा देखणा अविष्कार आपणास पाहावयास मिळतो. या सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांना देणगीरूपी मदत करायची असेल तर आपण देणगीरूपीही मदत करू शकता. या दिवशी ज्यांना रांगोळी काढायची असेल, दीप प्रज्वलन करायचे असेल, तर आपण आवश्य सहकार्य करू शकता , आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच  सोहळा संपन्न होत असतो. तरी सर्व अंबिका भक्तांनी या "ना भूतो ना भविष्यती”अश्या “त्रिपुरारी पौर्णिमा” सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.     
आपले नम्र,
ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थ तोंडोली,
जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट, मुंबई-ठाणे (तोंडोली),
श्री अंबिका ग्रामविकास मंडळ, तोंडोली.
Widgets
 

सन्माननीय सभासद आणि तोंडोली ग्रामस्थ. व सर्व अंबिका माता भक्तजन यांसी जाहिर आवाहन.. Open Announcement

X