Social Icons

Image and video hosting by yuvrajmohite.com

Bhupali shri dattprabhuchi

भूपाळी श्रीदत्तप्रभूची



उठीं उठीं बा आत्मया । चिन्मया दत्तात्रेया ।

सोडुनिया गुणमय शय्या । जागृत हो अपसैय्या ॥ध्रु०॥

झाली बा प्रबोध पहांट विवेक हा अरुण ।

आला उजळित आशा आतां उगवे चित्किरण ॥१॥

फिक्कट पडला व्यवहारेंदु वैरि निशाचर ।

कामादि हे लपले पाहुनि प्रकाश हा थोर ॥२॥

दुस्तर्कादिक दिवाभीत दडले ते ह्या वेळीं ।

दुर्वृत्ती ह्या तारा गगनीं मावळल्या सकाळीं ॥३॥

शमादि विप्र पुढें सादर राहति सांडुनिया दर ।

उठी उठी बा तूं निजरुपा दावीं ह्या सादर ॥४॥

रागद्वेष मलोत्सर्गा करुनि आला पुढती ।

वासुदेवा भेट दे हा करिताहे प्रणती ॥५॥

Bhupali shri dattprabhuchi

भूपाळी श्रीदत्तप्रभूची


उठी उठी बा मुनिनंदना । भक्त पातले दर्शना ।

त्यांची पुरवी तूं कामना । पाही नयन उघडूनी ॥ध्रु०॥

उघडुनियां करुणादृष्टी । दासां धरी आपुलें पोटीं ।

नको येऊं देऊं हिंपुटी । घाली कंठीं मिठी हर्षें ॥१॥

हर्षे तुझे पदीं रंगले । दारागारा विसरले ।

निजदेहा न भुलले । विनटले निजभावें ॥२॥

निजभावें येतां शरण । लपविसी कां बा चरण ?

जेणें तरती दुष्टाचरण । मग मरणभय कैचें ? ॥३॥

नको करुं निष्ठुर मन । शीघ्र देई आश्वासन ।

तूं अससी करुणाघन । तापशमन करि शीघ्र ॥४॥

उठीं उठीं बा सद्‌गुरुराया । उठी उठी करुणालया ।

उठी उठी वा चिन्मया । निजमाया आवरीं ॥५॥

Bhupali shri dattatryechi

भूपाळी श्रीदत्तात्रेयाची


उठिं उठिं बा दत्तात्रेया । भानु करुं पाहे उदया ।

करणें दीनांवरती दया । चरण दावें वेगेंसी ॥ध्रु०॥

मंद वायूही सूटला । पक्षी करिताती किल्बिला ।

दीपवर्ण शुभ्र जाला । पूर्व दिशा उजळली ॥१॥

करुनि कृष्णेचें सुस्नान । घेऊनि पूजेचें सामान ।

सकळां लागलें तव ध्यान । कपाट केव्हां उघडेल ॥२॥

आले देवादिक दर्शना । त्यांच्या पुरवाव्या कामना ।

संतोषोनि आपल्या मना । तीर्थप्रसाद अर्पावा ॥३॥

गुरु त्रैमूर्ति साचार । करिसी पतितांचा उद्धार ।

म्हणुनि धरिसी हा अवतार । संकटीं भक्‍तां रक्षिसी ॥४॥

रामदास लागे पायीं । मागे इच्छा हेंचि देई ।

तूंचि माझी बाप मायी । प्रतिपाळावें भक्‍तांसी ॥५॥

Bhupali shri dattprabhuchi

भूपाळी श्रीदत्तप्रभूची


दत्तदिगंबरा, ऊठ करुणाकरा । पहाट झाली पुरे झोंप आतां ।

भक्तजन हे उभे वाट पाहती सभे । दर्शनें देई त्यां शीघ्र शांता ॥ध्रु०॥

अरुण तम दूर करी कुंकुमें नभ भरी । बापडी ही उषा पदर पसरी ।

गंग खळखळ करीं त्वद्यशें जगभरी । मंद वाहे कशी अनिललहरी ॥दत्त०१॥

वनगंधर्व हे सुस्वरें गाइती । मोर केकारवें नृत्य करिती ।

मुनिकुलें गर्जती वेदमंथगिरा । ऊठ बा श्रीधरा राधु पठती 
॥दत्त०२॥

षट्‌पदें पद्मदलीं गुंजती प्रियकरा । भेटती ही मुद्रा चक्रपिल्ली ।

रंग कष्टी उभा पाहूं दे मुखप्रभा । लोळूं दे सतत बा चरणकमळीं ॥दत्त०३॥

Bhupali santanchi

भूपाळी संतांची

उठिं उठिं बा पुरुषोत्तमा । भक्तकामकल्पद्रुमा ।

आत्मारामा निजसुखधामा । मेघश्यामा श्रीकृष्णा ॥ध्रु०॥

भक्तमंडळी महाद्वारीं । उभे निष्ठत श्रीहरी ।

जोडोनियां दोन्ही करीं । तुज मुरारी पाहावया ॥१॥

संतसनकादिक नारद । व्यास वाल्मीकि ध्रुवपह्लाद ।

पार्थ पराशर रुक्मांगद । हनुमान अंगद बळिराजा ॥२॥

झाला प्रातःकाळ पूर्ण । करीं पंचांग श्रवण ।

आला मुद्‌गलभट ब्राह्मण । आशीर्वचन घे त्याचें ॥३॥

तुझा नामदेव शिंपी । घेउनि आला आंगी-टोपी ।

आतां जाऊं नको बा झोंपीं । दर्शन देई निजभक्‍तां ॥४॥

नानापरिचे अलंकार । घेऊनि आला नरहरि सोनार ।

आला रोहिदास चांभार । जोडा घेऊनि तुजलागीं ॥५॥

सुगंध सुमनें पुष्पांजुळी । घेऊनि आला सांवता माळी ।

म्हणे श्रीरंगा पदकमळीं । अनन्यभावें समर्पू ॥६॥

कान्हुपात्रा नृत्य करी । टाळछंदे साक्षात्कारीं ।

सेना न्हावी दर्पण करीं । घेउनि उभा राहिला ॥७॥

लिंबुर हुरडा घेउनि आला । तो हा माणकोजी बोधला ।

दर्शन द्यावें बा ! त्याजला । भक्त भोळा म्हणऊनी ॥८॥

मिराबाई तुझेसाठीं । दूध-तुपें भरुनी वाटी ।

तुझे लावावया ओठीं । लक्ष लावुनी बैसली ॥९॥

नामदेवाची जनी दासी । घेऊनि आली तेल-तुपासीं ।

तुज न्हाऊं धालावयासी । उभी ठेली महाद्वारीं ॥१०॥

गूळ-खोबरें भरुनी गोणी । घेउनि आला तुकया वाणी ।

वह्या राखिल्या कोरडया पाणीं । भिजों दिल्या नाहीं त्वां ॥११॥

आला चोखामेळा महार । स्वामी करीतसे जोहार ।

त्याचा करोनियां उद्धार । संतमेळीं स्थापिला ॥१२॥

हरिभजनाविण वाया गेले । ते नरदेहीं बैल झाले ।

गोर्‍याकुंभारें आणिलें । खेळावया तुजलागीं ॥१३॥

गरुडपारीं हरिरंगणीं । टाळमृदुंगाचा ध्वनी ।

महाद्वारीं हरिकीर्तनीं । तल्लिन कान्हा हरिदास ॥१४॥

निजानंदें रंगे पूर्ण । सर्वही कर्में कृष्णार्पण ।

श्रीरंगानुजतनुज शरण । चरणसेवा करीतसे ॥१५॥

Bhupali dashavtaranchi

भूपाळी दशावतारांची


जन म्हणा हो श्रीहरि । प्रातःकाळीं स्मरण करी ।

तेणें तराल भवसागरीं । हा निर्धार भंरवसा ॥ध्रु०॥

वेद नेले निशाचरीं । मत्स्यरुप झाले हरी ।

कार्य ब्रह्मयाचे करी । शंखासुर वधोनियां ॥१॥

दैत्य मातले भूमंडळी । पृथ्वी नेली रसातळीं ।

कूर्मरुपी हो वनमाळी । पृष्ठीं धरिली मेदिनी ॥२॥

मही डळमळी पहा हो । देव झाले वराह हो ।

मग वधियेले दैत्य दानवो । पृथ्वी दाढे धरोनियां ॥३॥

पुत्र पित्यानें गांजिला । तो हा नरहरि स्मरता झाला ।

स्तंभीं अवतार धरियेला । भक्त रक्षिला प्रह्‌लादा ॥४॥

याग करितां झाला बळी । इंद्र कांपिन्नला चळचळीं ।

वामनरुपी हो वनमाळी । धाली पाताळीं बळीराजा ॥५॥

रेणुके उदरीं भार्गव झाले । राजे समस्त संहारिले ।

राज्य ब्राह्मणा दीधलें । सुखी केले भूदेव ॥६॥

सूर्यवंशी रघुनंदन । वानर सैन्य मिळवून ।

सागर पाषाणीं बांधून । संहारिलें राक्षसां ॥७॥

कारागृहीं अवतरले । श्रीकृष्ण गोकुळीं वाढिन्नले ।

कंसचाणूर मर्दिले । राज्य स्थापिलें उग्रसेना ॥८॥

बौद्ध अवतार धरियेला । जन हा बहुत कष्टी झाला ।

मग कलीस वरा दीधला । आपण राहिले निद्रिस्थ ॥९॥

पुढें कलंकी होणार । ऐसा शास्त्राचा निर्धार ।

मग फिरेल भवसंदेह । या हो विश्वजनाचा ॥१०॥

दशावतारांची भूपाळी नित्यस्मरा प्रातःकाळीं ।

दास म्हणे हो भूमंडळी भाग्यवंत होतील ॥११॥

Bhupali nadyanchi

भूपाळी नद्यांची



प्रातःकाळीं प्रातःस्नान । घडे केलिया स्मरण ।

महादोषांचें दहन । महिमा गहन पुराणीं ॥ध्रु०॥

गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागीरथी ।

पूर्णा फल्गु भोगावती । रे गौतमी वैतरणी ॥१॥

काळी कालिंदी किंकिणी । कपिलायणी इंद्रायणी ।

नलिणी अर्चिणी धर्मिणी । ताम्रवर्णी नर्मदा ॥२॥

कुंदा वरदा माहेश्वरी । तुंगभद्रा आणि कावेरी ।

घटपाटपती मलप्रहरी । दुरितहरी जाह्नवी ॥३॥

भीमा वरुणा मंदाकिनी । पूर्णपदा पुन्हपुन्ही ।

वज्रा वैष्णवी त्रिवेणी । कुमुदिनी नारदी ॥४॥

मनकर्णिका वेदावती । कुकुद्वती हेमावती ।

सीता प्रयागी मालती । हरिद्वयती गंडिका ॥५॥

सरयू गायत्री समुद्रा । कुरुक्षेत्रा सुवर्णभद्रा ।

दास म्हणे पुण्यक्षेत्रा । नाना नद्या गोविंदीं ॥६॥

bhupali gangechi

भूपाळी गंगेची
 

उठोनियां प्रातःकाळीं । वदनीं वदा चंद्रमौळी ।

श्रीबिंदुमाधवाजवळीं । स्नान करा गंगेचें । स्नान करा गोदेचें ॥ध्रु०॥

स्नानदान जया अंतरीं । घडेल भागीरथीच्या तीरीं ।

हरि कृपा करिल त्यावरी । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥ (गोदेचें) ॥१॥

भागिरथीचें स्नान करा । हृदयीं स्मरा गंगाधरा ।

चुकेल चौर्‍यांशींचा फेरा । ऐसें महात्म्य गंगेचें ॥२॥

गंगा आहे स्वर्गावरतीं । पाताळीं ते भोगावती ।

मृत्युलोकीं हे विख्याती । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥३॥

कृष्णावेण्या तुंगभद्रा । शरयू कालिंदी नर्मदा ।

भीमा भामा मुख्य गोदा । करा स्नान गंगेचें ॥४॥

व्यास वाल्मीकि नारदमुनि । अत्रि वसिष्ठ आणि जैमिनी ।

गुरुदत्त येति माध्यान्हीं । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥५॥

आली आषाढी एकादशी । चला जाऊं पंढरिसी ।

पांडुरंगाच्या चरणापाशीं । दावी माहात्म्य गंगेचें ॥६॥

Bhupali shankarchi

भूपाळी शंकराची


धवळे भोळे चक्रवर्ती । धवळे अलंकार शोभती ।

धवलें धाम उमापती । सदा चित्तीं चिंतावा ॥ध्रु०॥

धवळ्या जटा गंगाजाळ । धवळा मयंक निर्मळ ।

धवले कुंडलांचा लोळ । शंखमाळ लोंबती ॥१॥

धवळी स्फटिकांची माळ । धवळे गळां उलथे व्याळ ।

धवळें हातीं नर-कपाळ । धवळा त्रिशूळ शोभतसे ॥२॥

धवळा सर्वांगें आपण । धवळें विभूतीचें लेपन ।

धवळें गात्र धवळें वसन । धवळें वाहन नंदीचें ॥३॥

धवळें कैलास भुवन । धवळें मध्यें सिंहासन ।

धवळें शंकराचें ध्यान । दास चिंतन करीतसे ॥४॥

Bhupali Pandarichi

भूपाळी पंढरीची -





उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊं पंढरीसी ।

भेटों विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविधताप हरतील ॥ ध्रु. ॥

चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।

तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥

गंगा यमुना सरस्वती । क्रुष्णा वेण्या भागिरथी ।

तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपतिदर्शना ॥ २ ॥

तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।

स्नाने केलिया बाहेरी । महादोश हरतील ॥ ३ ॥

रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।

माता पिता विश्र्वंभर । पैलपार तरतील ॥ ४ ॥

Bhupali ramachi

भूपाळी रामाची



उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।

स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥

राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।

राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दसांचे ॥ १ ॥

रामे तटका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।

रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥

रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।

रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥

रामें रक्षीलें भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी

रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥

Bhupali Shri Krishnachi

भूपाळी श्रीकृष्णाची




ऊठिं गोपालजी जाइं धेनुंकडे । पाहती सौगडे वाट तूझी ॥ ध्रु. ॥

लोपली हे निशी मंद झाला शशी । मुनीजन मानसीं ध्याति तुजला ॥ १ ॥

भानु-उदयाचळीं तेज पुंजाळलें । विकसती कमळें उदकावरी ॥ २ ॥

धेनुवत्सें तुला बाहती माधवा । ऊठिं गा यादवा उशिर झाला ॥ ३ ॥

ऊठिं पुरुशोत्तमा वाट पाहे रमा । दाविं मुखचंद्रमा सकळिकांसी ॥ ४ ॥

कनकपात्रांतरी दीपरत्नें बरी । ओंवाळिती सुंदर तूजलागीं ॥ ५ ॥

जन्मजन्मांतरीं दास होऊं हरी । बोलती वैखरी भक्त तुझे ॥ ६ ॥

कृष्णकेशव करीं चरणांबुज धरी । ऊठिं गा श्रीहरी मायबापा ॥ ७

जाग रे जाग बापा । विश्र्वपालका कृष्णा ।

दीन आम्ही उभे द्वारी । आमुची बोळवीं तृष्णा ॥ ध्रु. ॥

त्रासलो प्रपंची या । बहु कष्टलों भारी ।

म्हणवूनि शरण आलों । विभो तुझिया द्वारीं ॥ जाग. ॥ १ ॥

सांग बा न्यून काय । हरि तुझिया भांडारीं ।

याचक भीक मागे । प्रेम दीई झडकरी ॥ जाग. ॥ २ ॥

गुरुकृपे उदयो झाला । हरि उदया आला ।

सुख ते काय सांगूं । जिवलग भेटला ॥ जाग. ॥ ३ ॥

श्रीगुरुनाथराया । कृपासिंधु गोविंदा ।

देवनाथ प्रार्थिताहे । प्रभुपदारविंदा ॥ जाग. ॥ ४ ॥

Bhupali marutichi

भूपाळी मारुतीची



उठा प्रातःकाळ झाला । मारुतीला पाहुं चला ।

ज्याचा प्रताप आगळा । विरंचीही नेणतो ॥ ध्रु. ॥

आमुचा हनुमंत साह्यकरी । तेथें विघ्न काय करी ।

दॄढ धरा हो अंतरीं । तो त्वरीत पावेल ॥ १ ॥

आमुचा निर्वाणींचा गडी । तोचि पावेल सांकडीं ।

त्याचे भजनाचे आवडी । दॄढ बुध्दि धरावी ॥ २ ॥

थोर महीमा जयाची । कीर्ति वर्णवी तयाची ।

रामी रामदासाची । निकत भक्ति करवी ॥ ३ ॥

Bhupali ghanshyam shridharachi

भूपाळी घनश्याम श्रीधराची



घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ।

उठीं लवकरि वनमाळी ! उदयाचळीं मित्र आला ॥ ध्रु ॥

सायंकाळी एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं ।

अरुणोदय होतांचि उडाले चरावया पक्षी ।

अघमर्षणादि करुनि तापसी तपाचरणदक्षी ।

प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी ।

करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं ।

यमुनाजळासी जाती मुकुंदा ! दध्योदन भक्षीं ॥

मुक्तता होऊं पाहे । कमळिणीपासुनियां भ्रमरा ॥

पूर्वदिशे मुख धुतलें । होतसे नाश तिमिरा ॥

उठिं लवकरि गोविंदा । सांवळ्या नंदकुमारा ।

मुखप्रक्षालन करीं अंगिकारी भाकर -काला ॥ १ ॥

घरोघरी दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती ।

गीत गाति सप्रेमें गोपी सदना येति जाती ॥

प्रवर्तोनि गृहकर्मी रंगावळि घालूं पाहती ।

आनंदकंदा ! प्रभात झाली उठ सरली राती ॥

काढीं धार क्षीरपात्र घेउनि धेनू हंबरती ।

द्वारी उभे गोपाळ तुजला हांक मारुनि बाहती ॥

हे सुमनहार कंठी । घालि या गुंजमाळा ।

हाती वेत्रकाष्ठ बरवें । कांबळा घेइं काळा ॥

ममात्मजा मधुसूदना । ह्रुषीकेशी जगत्पाळा ।

हंबरताति वांसरे हरि धेनुस्तन-पानाला ॥ २ ॥

प्रातः स्नाने करुनि गोपिका अलंकार नटती ।

कुंकुमादि चर्चुनी मंथनालागिं आरंभिती ।

प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळि गाती ।

अर्घ्यदान देउनियां द्विजजन देवार्चन करिती ॥

नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णु-पूजा समर्पिती

स्मार्त शिवार्चनसक्त, शक्तितें शाक्त आराधिती ॥

ऋषिगण आश्रमवासी । जे कां निरंजनी धाले ।

अरुनोदय होतांचि । आपुले ध्यानिं मग्न झाले ॥

पंचपंच-उषःकालीं । रविचक्र निघों आलें ।

येवढा वेळ निजलासिम्हणुनि हरि कळेल नंदाला ॥ ३ ॥

विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपायी ।

अध्यापन गुरु करिति शिष्यही अध्यायना उदयीं ॥

याज्ञिकजन कुंडांत आहुती टाकिताति पाहीं ।

रविप्रभा पडुनियां उजळल्या शुद्ध दिशा दाही ॥

हे माझे सावंळे पाडसे उठिं कृष्णाबाई ।

सिद्ध सवें बळिराम घेउनि गोधनें वना जाई ॥

मुनिजनमानसहंसा । गोपीमनःकमलभृंगा ।

मुरहर पंकजपाणी । पद्मनाम श्रीरंगा ॥

शकटांतक सर्वेशा । हे हरि प्रतापतुंगा ।

कोटिरवींहुनि तेज आगळें तुझिया वदनाला

होनाजी बाळा नित्य ध्यातसे ह्रुदयि नाममाळा ॥ ४ ॥

Bupali Sri Ganpatichi

भूपाळी श्रीगणपतीची



उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।

ऋध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥

अगीं शेंदुराची उटी । मथां शोभतसे कीरिटी ।

केशरकस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥

कानी कुंडलाची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।

माजीं नागबंद शोभा । स्मरतां उभा जवळी तो ॥ २ ॥

कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।

रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥
Widgets
 

सन्माननीय सभासद आणि तोंडोली ग्रामस्थ. व सर्व अंबिका माता भक्तजन यांसी जाहिर आवाहन.. Open Announcement

X