श्लोक ८१ ते १००
मना मत्सरे नाम सांडूं नको हो।
अती आदरे हा निजध्यास राहो॥
समस्तांमधे नाम हे सार आहे।
दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥
बहु नाम या रामनामी तुळेना।
अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे।
जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो।
उमेसी अती आदरें गूण गातो॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।
परी अंतरी नामविश्वास तेथें॥८३॥
विठोने शिरी वाहिला देवराणा।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।
जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥८४॥
भजा राम विश्राम योगेश्वरांचा।
जपू नेमिला नेम गौरीहराचा॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं॥८५॥
मुखी राम विश्राम तेथेचि आहे।
सदानंद आनंद सेवोनि आहे॥
तयावीण तो शीण संदेहकारी।
निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥
मुखी राम त्या काम बाधुं शकेना।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी।
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥८७॥
बहू चांगले नाम या राघवाचे।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे।
जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें॥८८॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावें।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥८९॥
न ये राम वाणी तया थोर हाणी।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी॥
हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी॥९०॥
नको वीट मानूं रघुनायकाचा।
अती आदरे बोलिजे राम वाचा॥
न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा।
करीं घोष त्या जानकीवल्लभाचा॥९१॥
अती आदरें सर्वही नामघोषे।
गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषें।
विशेषें हरामानसीं रामपीसें॥९२॥
जगीं पाहतां देव हा अन्नदाता।
तया लागली तत्त्वता सार चिंता॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे।
मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥
तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां।
निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥
जपे आदरें पार्वती विश्वमाता।
म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥
अजामेळ पापी वदे पुत्रकामे।
तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी।
मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।
जपे रामनामावळी नित्यकाळीं॥
पिता पापरुपी तया देखवेना।
जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥
मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची।
अहंतागुणे यातना ते फुकाची॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥
हरीनाम नेमस्त पाषाण तारी।
बहु तारीले मानवी देहधारी॥
तया रामनामीं सदा जो विकल्पी।
वदेना कदा जीव तो पापरूपी॥९८॥
जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी।
तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥
मुखे रामनामावळी नित्य काळीं।
जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥
यथासांग रे कर्म तेंहि घडेना।
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥
दया पाहतां सर्व भुतीं असेना।
फुकाचे मुखी नाम तेंही वसेना॥१००॥