हरतालिकेची आरती
जय देवी हरतालिके ।
सखी पार्वती अंबिके ।
आरती ओवाळीते ज्ञानदीपकळिके ॥धृ॥
हरअर्धांगी वससी ।
जासी यज्ञा माहेरासी ।
तेथें अपमान पावसी ।
यज्ञकुंडी गुप्त होसी ॥१॥
रिघसी हिमाद्रिच्या पोटीं ।
कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी ।
आचरसी उठाउठी ॥२॥
तपपंचाग्निसाधनें ।
धूम्रपानें अधोवदनें ।
केली बहु उपोषणें ।
शंभु भ्रताराकारणें ॥३॥
लीला दाखवीसी दृष्टी ।
हें व्रत करिसी लोकांसाठी ।
पुन्हा वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावें संकटी ॥४॥
काय वर्णूं तव गुण ।
अल्पमती नारायण ।
माते दाखवी चरण ।
चुकवावें जन्ममरण ॥५॥