श्लोक ४१ ते ६०
बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।
शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥
विचारें बरें अंतरा बोधवीजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥
बहुतांपरी हेंचि आतां धरावें।
रघूनायका आपुलेसे करावें॥
दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥
मना सज्जना एक जीवीं धरावें।
जनी आपुलें हीत तूवां करावें॥
रघूनायकावीण बोलो नको हो।
सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।
कथा आदरे राघवाची करावी॥
नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।
सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥
जयाचेनि संगे समाधान भंगे।
अहंता अकस्मात येऊनि लागे॥
तये संगतीची जनीं कोण गोडी।
जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥
मना जे घडी राघवेवीण गेली।
जनीं आपुली ते तुवां हानि केली॥
रघूनायकावीण तो शीण आहे।
जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥
मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे।
जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥
सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।
सदा रामनामें वदे नित्य साचा॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥
सदा बोलण्यासारिखे चालताहे।
अनेकीं सदा एक देवासि पाहे॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४९॥
नसे अंतरी काम नानाविकारी।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥
मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी।
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥
करी सुखसंवाद जो उगमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥
चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥
नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।
वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥
तया अंतरी क्रोध संताप कैंचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥
जगीं होइजे धन्य या रामनामे।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥
उदासीनता तत्त्वता सार आहे।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥
नको वासना वीषयीं वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा।
मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥
मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥
मनीं कामना राम नाही जयाला।
अती आदरे प्रीती नाही तयाला॥५९॥
मना राम कल्पतरु कामधेनु।
निधी सार चिंतामणी काय वानूं॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता।
तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥