मना वासना चूकवीं येरझारा।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥
मना यातना थोर हे गर्भवासीं।
मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥
मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥
न बोलें मना राघवेवीण कांहीं।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥
रघुनायकावीण वांया शिणावे।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।
अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥
मना वीट मानूं नको बोलण्याचा।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे।
पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥
देहेरक्षणाकारणें यत्न केला।
परी शेवटीं काळ घेउन गेला॥
करीं रे मना भक्ति या राघवाची।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥
भवाच्या भये काय भीतोस लंडी।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरीं।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥
दिनानात हा राम कोदंडधारी।
पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥
पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥
समर्थाचिया सेचका वक्र पाहे।
असा सर्व भुमंडळी कोण आहे॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥
महासंकटी सोडिले देव जेणें।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥
अहल्या शिळा राघवें मुक्त केली।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥
जया वर्णितां शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥
चिरंजीव केले जनी दास दोन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥
उपेक्षी कदा रामरुपी असेना।
जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥
शिरी भार वाहेन बोले पुराणीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥
असे हो जया अंतरी भाव जैसा।
वसे हो तया अंतरी देव तैसा॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥
सदा सर्वदा देव सन्नीध आहे।
कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥
मना प्रार्थना तूजला एक आहे।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।
जयाचेनि योगें समाधान बाणे॥
तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥
मना पाविजे सर्वही सूख जेथे।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥
विविकें कुडी कल्पना पालटिजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥