संत बहिणाबाईचे अभंग
आरोग्य तात्काळ व्यथेचा हारास । झाला दिसंदीस भ्रताराचा ॥ १ ॥
मग करी कृपा बोले समाधानें । द्वेषाचें हें ठाणें दूर केलें ॥ २ ॥
म्हणे आतां सर्व जावें येथुनियां । आपुलीया ठाया स्वस्थानां ॥ ३ ॥
देवें आपणासी ब्राह्मणाच्या वेषें । सांगितला शेष प्राक्तनाचा ॥ ४ ॥
तेंचि आतां करूं हरीची वो भक्ती । मिरासींची खंती वाटियेली ॥ ५ ॥
माझीं मायबापें तयांसी सांगत । तुम्ही जा निवांत देवगांवा ॥ ६ ॥
आपण अरण्यात दोघे करूं वास । देवाच्या बोलास धरोनीया ॥ ७ ॥
होवो आतां कल्याण किंवा अकल्याण । आम्ही तों संपूर्ण भक्ती करूं ॥ ८ ॥
तुकोबाचे गांवा जाऊनीया राहों । मनींच दृढावो धरोनीया ॥ ९ ॥
ऐसी पालटली भ्रताराची बुद्धि । स्वामी कृपानिधी अंतरसाक्ष ॥ १० ॥
काय एक देव करील तें नव्हे । प्रत्यक्ष अनुभवें सर्वजनां ॥ ११ ॥
बहिणी म्हणे अवघी चालिलों । तुकोबाच्या आलों दर्शनासी ॥ १२ ॥