Social Icons

Image and video hosting by yuvrajmohite.com

Bhagirathibai Abhang Sangraha 81 to 90

भागीरथीबाई - अभंग संग्रह ८१ ते ९०



चाल -यारो अपने रामको०

आम्ही अन्यायी अन्यायी

दत्ता क्षमा केली पाही ॥ध्रृ०॥

आम्ही होतो आपुले गांवी ।

तेथे कांहीच झाले नाही ॥

म्हणुनि आलो याचि ठायी ।

करणी करुनी तूंच पाही ॥१॥

संत महंत अमुचे अंग ।

ते सदा स्वरुपी दंग ॥

बोलतां होतो त्यांचा भंग ।

तूं मनी समजोनि राही ॥२॥

अहांत आपण बहू थोर ।

करा विचार सारासार ॥

नाही तर पाठीवर घाव ।

घालोनीया पाही ॥३॥

पिटुं भक्तीचा डांगोरा पाही ।

अविद्येचा वारा नाही ॥

सदा ज्ञानवैराग्यी राही ॥४॥

नको कोणाचा अडका -रुका ।

नाही प्रपंचाचा धक्का ॥

सद्गुरुनाथ आमुचा सखा ।

वारंवार चरणां ध्यायी ॥५॥

नको आम्हां दुर्जनसंग ।

सदा होतो मन भंग ॥

बलभीमचरणी ठेवी डोई ,

भागिरथी मुरुनि राही ॥६॥

पद ८२

चाल -उत्तम हा नरदेह

बोले सुलभा धन्य तूं जनका वैदेही म्हणवीसी ।

चारी देहांचे निरसनावांचुनी विदेही कैसी होसी ॥ध्रृ०॥

पाहुनि तेव्हां जनकाची सभा बैसलीसे सुलभा ।

प्रश्नउत्तरे परस्परे ती पुसती वेळोवेळां ॥

जातकूळ तव तथा वर्णाश्रम सांगे तूं मजसी ।

वचन ऐकतां हांसूं आले तेव्हां सुलभेसी ॥१॥

नेत्रद्वारे जाऊनि सुलभा जनक -हृदयासी ।

नको चिकित्सा करुं आतां तूं , ऐक दृष्टांतासी ॥

एक वेश्या असे सुंदरा पद्मपुर नगरासी ।

काय सांगूं नवल ऐक रुपकरहस्यासी ॥२॥

शमदम साधन करुनी सोडी स्थूल देहासी ।

पुरुषार्थाचा अभिमान घेउनी , गती काय सूक्ष्माची ॥

लिंग कारण महाकारणां , कैसे निरसन करसी ।

अंतःस्थिति ही ऐसी पाहतां अप्रमाण वाटे मजसी ॥३॥

तेव्हां योगिनि सांगे जनका धरि सद्गुरुचरणांसी ।

भावभक्तिसह प्रेमे पाहा , सद्गुरु सगुणासी ॥

लीन होवोनि जनक आदरे शरण आला तिजसी ।

एकनिष्ठे भागिरथी धरि बलभिम व्यक्तिसी ॥४॥

पद ८३

चाल -जा मिळावया स्वामीला०

जा मिळावया पत्नीला ।

पाप पुण्याच्या भागीला ॥ध्रृ०॥

बोले नारद " गृहासि जाउनी ।

सत्वर येईं स्त्रियेसि पुसुनी ॥

पुत्रस्नुषादिक आदि करोनी ।

व्हा सहाय्य कोणि पापाला ॥१॥

जीव मारुनी पर्वत केले ।

ब्राह्मण वधुनी दोष घडले ॥

जानव्यांनी रांजण भरले ।

द्या साथी कोणी वाल्याला " ॥२॥

वाल्या पुसे कुटुंबाला ।

घ्या मम पापाच्या हिश्श्याला ॥

न घेऊं म्हणती आम्ही पापाला ।

घेऊं पुण्याच्या विभागाला ॥३॥

रुदन करीत वाल्या कोळी ।

धांवत येई नारदाजवळी ॥

साह्य करीना मजला कोणी ।

घ्या पदरी मज दीनाला ॥४॥

ऐसे पाहुनी भागिरथीही ।

पश्चात्ताप धरी प्रपंची ॥

धांवुनी धरी गुरुचरणांसी ।

बलभिमराय धरी कराला ॥५॥

पद ८४

चाल -पंढरपुरासि जाते बाई०

रामदास रामिं मिळाले रामिं मिळाले ॥ध्रृ०॥

नवमीच्या दिनि प्रभु शेजे । कैवल्यपदी नीमाले ॥१॥

भक्तजनांसी उद्धरुनीया । आनंदसागरी नेले ॥२॥

नेति नेति म्हणुनी वेदान्त दाविला ।श्रुति अन्वयपद दावीले ॥३॥

शंका समाधानासाठी त्यांनी । दासबोध ग्रंथ करोनी गेले ॥४॥

दयाळु सद्गुरु माउलि ऐशी । शिवाजीसाठी अवतरले ॥५॥

बलभीमवचनी प्रेम ठेवुनी । भागिरथीने याइयेले ॥६॥

पद ८५

चाल - जग हे आळवावरचे पाणी०

जय जय नागेशनाथ योगी ।

निर्गुण बोली , त्यासिच शोभे , सगूण सुख भोगी ॥ध्रृ०॥

पौषमासी पंचमदीनी व्यक्ती अवतरली ।

विदेह स्थितीस अंगिकारुनी , पतितांसी तारी ॥१॥

शांतिदयेचे आगर तेची , भासत मज भारी ।

बंधुभगिनिते आनंदाने सांभाळुनी सारी ॥२॥

शास्त्रविधीने यथामतीने , पूजापाठ करी ।

बलभीमचरणी लक्ष ठेवूनी , ठकूसि साह्य करी ॥३॥

पद ८६

चाल -रुचती कां तीर्थयात्रा०

मथुराबाई भगिनीहि मन माझे मोहिते
पतिव्रता हीच जगी मजलागी भासते ॥ध्रृ०॥

शिशुसम जगत सारे तिजलागी वाटते ।

बालक जाणोनिया भोजन घालिते ॥१॥

धाक तिचा जाणुनिया नरसिंहगड कांपते ।

स्वामींनी जाणुनिया चरणी ते लागते ॥२॥

पतिआज्ञा घेउनियां गृहधंदा करीते ।

राजनीति जाणुनिया विचार सर्वा शिकविते ॥३॥

पार्वती , लक्ष्मी , सरस्वती , सावित्री भासते ।

बलभिमचरणी प्रेम ठेवूनी भागिर्थी पाहते ॥४॥

पद ८७

चाल -जाउं कामाला०

कृपा हो सद्गुरुची । भेटि झाली स्वामी रामारुढांची ॥ध्रृ०॥

शास्त्रिय वैदिक परिभाषेच्या ।

दिधली जाणिव शब्दांची ॥१॥

पंच भेदांसह जीव दाविला ।

माहिती दिली षडलिंगांची ॥२॥

पंचशास्त्रे वेव्हारिक उत्तर -।

मिमांसा सांगे वेदांची ॥३॥

शांत मूर्तिही बहुत असोनी ।

मिळणी मिळती सर्वांशी ॥४॥

बलभिमचरणी भागिरथी असतां ।

पूर्ण माहिती मज यांची ॥५॥

अभंग ८८

चाल -त्यजी भक्तासाठी लाज०

धरला वायुसुताचा हात । त्यासी केला मी एकांत ॥ध्रृ०॥

तुर्याबाई अंजनिमाता । तिथे पाहिले तिच्या सुता ॥

त्याने दिधला मज भोग । मग झाला मकरध्वज ॥१॥

मगरी झाले भवडोही । कामक्रोध नक्र पाही ॥

बलभीम केलासे कांत । चरणी ठेवी भागिरथी चित्त ॥२॥

पद ८९

चाल -जग हे आळवावरचे०

जयजय राममाई बोला ।

नर्मदातटाकी वास करोनी , नामरस नेला ॥ध्रृ०॥

ॐकारेश्वरी येतांजाता उतारकरु फार ।

देशोदेशिंच्या अबला येउनि घेति विसाव्याला ॥१॥

शांति दयेची आगर असुनी उदारता फार ।

इच्छाभोजन हे सर्वांना चित्ती आल्हाद ॥२॥

काशिरामेश्वरी कीर्ती गेली येति दर्शनाला ।

मूर्ती पाहुनी आनंदती उल्हास मनाला ॥३॥

मुमुक्षु जन हे आर्त होउनी येती भजनाला ।

ग्रंथ घेउनी कोणी येती वाचिती पोथीला ॥४॥

बलभिमचरणी लक्ष ठेवूनी आईला विनवीते ।

भागिरथीसी अंकी घेउनि पुरवि लाडाला ॥५॥

पद ९०

चाल -जग हे आळवावरचे पाणी०

जयजय गंगुबाई बोला ।

प्रेमभक्तीने पूजन करुनी , अर्पिती दत्ताला ॥ध्रृ०॥

सात्विक वृत्ती असे सदोदित , नसे काम -क्रोधाला ।

द्वैतभाव हा नसे दृष्टिसी आनंद चित्ताला ॥१॥

श्रीसंपत्तिची कमी नसे मुळिं , गाडीघोड्याला ।

गर्व सांडुनी सदा लीनता , बोले मधु वचनाला ॥२॥

पुत्र -संतती असे उदरी शांती चित्ताला ।

उत्सुकतेने दत्तजयंती करी उत्सवाला ॥३॥

पतितवचनाने गृहधंदा करि , चालवि नेमाला ।

पुतणे , सुना , नाती , भाच्या आंवरि कुटुंबाला ॥४॥

असे पाहुनी भागिरथीसी आनंद बहु झाला ।

बलभिमाचरणी लक्ष ठेवुनी , गाई गूणाला ॥५॥
Widgets
 

सन्माननीय सभासद आणि तोंडोली ग्रामस्थ. व सर्व अंबिका माता भक्तजन यांसी जाहिर आवाहन.. Open Announcement

X