भागीरथीबाई - अभंग संग्रह ७१ ते ८०
चाल -अग्नि तरी परतंत्र आहे०
मी कसा स्वतंत्र आहे ।
गुरुकृपेने अनुभव पाहे ॥ध्रृ०॥
प्रल्हाद बोले ताडिसी मारिसी ।
न जळे , न तुटे तो मी आहे ॥१॥
पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश ।
हे सारे परतंत्र आहे ॥२॥
अस्थि , मांस , त्वचा , नाडी , रोम ।
हे पृथ्वीचे अंश आहे ॥३॥
लाळ , मूत्र , शोणित , स्वेद , रेत ।
हे तो आपतत्त्व आहे ॥४॥
क्षुधा , तृषा , आळस , निद्रा , कांती ।
हे अग्नितत्त्वाचे आहे ॥५॥
चलन , वलन , धावन , प्रसरण , रोधन ।
हे वायूअधीन आहे ॥६॥
काम , क्रोध , लोभ , मोह , भय ।
हे आकाशविकार आहे ॥७॥
तात भाव हा शोधुनि पाहतां ।
तोहि पंचभूतात्मक आहे ॥८॥
बलभीम सद्गुरुनाथ माझे ।
भागिरथी स्वानुभव गये ॥९॥
पद ७२
चाल -तिळगुळ घ्या मंजुळ बोला०
भावासी , म्हणे भक्ती ।
ज्ञानदृष्टि प्रेम राखी ती ॥ध्रृ०॥
स्थूल सूक्ष्म कारण हे तूं ।
अज्ञान दृष्टि टाकुनि दे तूं ॥
महाकारणी स्मरोनि राहे तूं ।
तुर्यारुप घे तूं गुरुयुक्ती ॥१॥
ईशसंकल्पी फसूं नको तूं ।
दृश्य मिथ्या जाणुनि घे तूं ॥
परब्रह्मिं हा न चले किंतू ।
ही बलाढ्य सद्गुरुशक्ती ॥२॥
चार आश्रम मुक्त हे मोती ।
ज्ञानराखिशी शोभा देती ॥
पारदर्शनी तेची नेती ।
कलियुगामध्ये जुगवीती ॥३॥
बलभिमराये नवलचि केले ।
गुरुकृपा पौर्णिमा पूर्णचि जाणे ॥
मन आवरोनी मनगटी बांधणे ।
निजपदी राहे भागिरथी ॥४॥
पद ७३
चाल -सद्गुरुने अवचित मजला०
ऐसा संत असावा कोणी । ज्याची शुद्ध सात्विक करणी ॥ध्रृ०॥
ज्या गांवी वसे असा संत । तो गांव सदा पवित्र ॥
त्याची वार्ता पडो माझे कर्णी ॥१॥
गांवोगांवी फिरतां जातां । जेथेतेथे दुःखाचिच वार्ता ॥
न दिसे ब्रह्मनिष्ठाची करणी ॥२॥
संत तीर्थ असे माझे मनी । तेथे जाउन कधिं मी न्हाणी ॥
कधिं पाहिन त्यांसि मी नयनी ॥३॥
गोविंदरावांसि पावन केले । बलभीमउदरी जन्मासि आले ॥
पितापुत्रासि भागिरथि नमुनी ॥४॥
पदे ७४
चाल -कृष्ण ग माझा कणकण०
अग सखे बाई सांगुं मी कांही
नवल जगाची अशी तर्हा ॥
ब्रह्मिं माया ही कैसी झाली
पुसती वेळोवेळ मला ॥ध्रृ०॥
कोणे दिवशी कोणे काळी
झालि असे ही माया गे ॥
कोण्या तिथिसी कोण्या मासी
जन्मा आली ही जाया ॥१॥
गर्भि बाळ हे पुसे मातेसि
आपुल्या बापाची जन्मकथा ।
कुमुहूर्ती की सुमुहूर्ति जन्मला
हेंचि सांगे स्पष्ट मला ॥२॥
याचे उत्तर ऐक बाळा ,
उघड असे बा साचार ॥
जेव्हांपासूनि तूं पुसूं लागला
तेव्हांपासोनि उद्भवा ॥३॥
जेव्हांपासुनी पुसूं लागला
तेथोनि कृतद्वापार ॥
त्रेतामध्ये गुरुदेव पूजुनी
म्हणसि मी हे आपण ॥४॥
कलियुगामध्ये वर्णसंकर
हा झाला असे गे सर्वत्र ।
सुखदुःखद्वंद्वे गांजिले ते
शरण येती सद्गुरुला ॥५॥
बलभिमचरणी भागिरथी ही
ठेवुनि ऐशी दृढ भाव ।
प्रेमामध्ये मग्न होउनी
झाली स्वरुपी गार गा ॥६॥
पद ७५
चाल -यमुनेच्या तीरी हरी विहार०
राधे मजवरि कां तूं रुससी ।
कपटि म्हणोनी नांव ठेविसी ॥ध्रृ०॥
अनयावरि तूं चित्त ठेविसी ।
अनीति सखिवरि प्रेमचि करिसी ॥१॥
निजस्वरुपासी विसरुनि माझ्या।
सवतीने वश केला म्हणसी ॥२॥
सत्यज्ञान मी देउनि तुजला ।
रुसलो म्हणुनी आळचि घेसी ॥३॥
सोड सोड हा संशय वैरी ।
घात करिल हा निज ठेव्यासी ॥४॥
दोघांचा तो त्याग करुनिया ।
रत हो माझ्या सगुणरुपाशी ॥५॥
बलभिमबाला भागिरथी ही ।
प्रेमे हितगुज सांगे तुजसी ॥६॥
पद ७६
चाल -कशि हरि तूं वाजवि०
धुंदी ध्यानी भरली की धुंदी ध्यानी भरली ॥
सद्गुरुने कृपा केली ॥ध्रृ०॥
बोधाच्या नादे आम्हां । बोलाविले गुणधामा ॥
अन्नपाणी मज गोड न लागे । तहान भूक हरली ॥१॥
बलभिमराये हो ऐसे केले । प्रबोध गळी उतरविले ॥
भ्रतारपोरे त्यागुनि आम्ही । गेलो त्यांचे सदनी ॥२॥
निजबोध ऐकुनि आले । निश्चळ पदी नाही भ्याले ॥
भागिरथी म्हणे इच्छा पूर्ण । ब्रह्मपदी भरली ॥३॥
पद ७७
चाल -रामा अभिमाना पासोनि०
सद्गुरु माझे अज्ञान आपण सोडवाना ।
लक्ष चौर्यांशी फिरुनी झाला शीण ॥ध्रृ०॥
मी तूं करितां गेला माझा जन्म ।
तुझ्या चरणी लागो माझे प्रेम ॥
आतां नको मज जन्ममरण ॥१॥
कर्म करितां शिणला माझा जीव ।
लाभ अलाभ न कळे मज माव ॥
आतां कैसे करुं हे सुचेना ॥२॥
आत्मज्ञान देवे कथियेले ।
ते मजसि नाही ठावे झाले ॥
आतां धरिले देवा दोन्ही चरण ॥३॥
हीन दीन भागिरथी जाण ।
बलभिमरायासी करी प्रार्थना ॥
शरण आले सोडूं नका जाण ॥४॥
पद ७८
चाल -गुरुची दया ग मजवरती०
स्त्रीचा आरोप मजवरता । कां हो गुरुमूर्ति करतां ॥ध्रृ०॥
पंचतत्त्वे न्याहाळीतां । दिसेना पुरुषस्त्री तत्त्वता ॥
कृपा सद्गुरुंची होतां । स्त्री -शूद्रादि नसे वार्ता ॥१॥
ऐसी अभ्यासाची खूण । जाइल स्त्रीपुरुष -भान निघून ॥
सर्वदूर परमात्मा पाहतां । राहिले मीच कोठे अरुता ॥२॥
सबोध मुमुक्षु जरि तुम्ही असतां । तरि भेदाची नसती वार्ता ॥
बलभिमचरणी ठकु असतां । कां दोषांसि पात्र होतां ॥३॥
पद ७९
चाल -मला दादला नको ग०
मला बायको नको रे बुवा ।
नको नको म्हणतां गळ्यांत पडते ॥
याला मी काय करुं बूबा ॥ध्रृ०॥
उठते लौकर जाते शेजारी ।
चारसहांची खटपट करी बूवा ॥२॥
घरचे जाते ते जात ओळखत नाही ।
चिदानंदाची चोळी घालत नाही बूवा ॥३॥
बोधाचा आला पाला खायला बसते ।
फलश्रुति तेलाची धार मागते बुवा ॥४॥
सद्गुरु बलभिमचरणी भागिरथी ।
समरसोनि गेली रे बूवा ॥५॥
पद ८०
चाल -हा परमसनातन विश्व०
मत्प्राणसखे तूं ऐक चंद्रिके आतां ।
तुजसाठी सगुण मी झालो निर्गुण असतां ॥ध्रृ०॥
हा खेळ मांडिला परोपरी गमतीचा ।
या खेळा पुससी कोण कोठिला कोणाचा ॥
हा हट्ट तुझा मज सोडवेना प्रेमाचा ।
तव हट्ट पुरविण्या बोलतसे ही वाचा ॥ चाल ॥
किति लपसी सांधोसांधी लाडके ।
किति आड मार्गाने जासी लाडके ॥ चाल ॥
तूं शिकविसि मजला लपण्याछपण्या आतां ॥१॥
जग खोटे असुनी खरे काय सांगावे ।
धन कुबेर असुनी द्रव्य कोणा मागावे ॥
त्यापरि तूं सखये , फससि इंद्रजालांत ।
मम वचना खोटे ठरविसि त्या नादांत ॥ चाल ॥
आतां चूक कोणाची सांग जिवलगे ।
मशि डोळे उघडुनि पाह जिवलगे ॥ चाल ॥
दे सोडुनि अवघा मनिंचा संशय नसता ॥२॥
मज तूंचि शिकविले असत्य जग वदण्याला ।
मम स्वरुपी कोठे शोधुं दृश्यकणाला ॥
तव शुद्ध प्रेम ते अर्पी गुरुचरणाला ।
मग संशयशत्रू त्वरित जाय विलयाला ॥ चाल ॥
तुज प्रबोधमार्गे जाणे आवडो ।
दृश्यात्मक खोट्या लीला नावडो ॥ चाल ॥
भागिरथी धरी सद्गुरुचरणांसी आतां ॥३॥