श्री दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेती नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीगुरूदत्ता ।
आरती ओवाळीतां हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त ।
अभाग्यासी कैंची न कळे ही मात ।
पराही परतली तेथें कैसा हा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ जय ॥ २ ॥
दत्त येउनियां उभा ठाकला ।
साष्टांगे नमुनी प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ जय ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हरपलें मन झालें उन्मन ।
मीं तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ जय ॥ ४ ॥